Wednesday, April 11, 2007

लहान मुलांच्या खाण्याविषयी

एकीकडे पौष्टीक ,सात्वीक असले शब्द वापरणारे पालक आपल्या मुलाच्या रड्यासमोर हात टेकताना पाहून मन चलबिचल होतं. दुसरीकडे जाहिरातवाले माझं प्राँडक्ट एखाद्याच्या माथी कसं मारू याच्याच मागे लागलेले दिसतात.रोज एक नवीन पिशवीबंद पदार्थ.बरोबर मी लहान मुलं जे काही फास्टफूड किंवा जंकफूड खातात त्याच बद्दल बोलतो आहे. शेकडो कंपनीज आहेत भारता मध्ये.मुलांना आकर्षित करण्याचे नवनवीन प्रकार सुरु आहेत
सध्या.टँटू, स्टीकर्स, गाड्या आणि बरच काही फ्री मिळतं आजकाल ह्या असल्या खाद्य पदार्थां बरोबर.आता पालकांना जे आपल्या बाळासाठी दिवस रात्र एक करून पैसा कमवत असतात आणि त्याची शक्यतेवढ्या चांगल्या प्रकारे काळजी घेत असतात ते ,खूप कमी वेळेला या खाद्यापदार्थांचा आपल्या मुलावर काय वाईट परीणाम होतो याचा विचार करताना दिसतात.मुल रडू नये म्हणून त्याचा हावा तो हट्ट पुरा केला जातो. दिवस दिवसभर ते मुल त्याच हानिकाराक नाही पण आरोग्यासाठी फार उपयोगीसुध्दा नसलेल्या खाद्यपदार्थांवर जिवंत असतात
पोषक आहार देतादेता या सर्वगोष्टीदेणे योग्य हे आजकालच्या पालकांना समजावे हेच योग्य नाही तर पुढची पिढी सुद्रुढ होइल याची शंका वाटते.

Tuesday, April 3, 2007

कोणाला आय.टी. वाला व्हायचंय का ?

कोणाला आय.टी.वाला व्हायचं असेल तर खूप सोप्प आहे.आय.टी वाल्यानी आय.टी म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान नव्हे तर 'ऐटी'त रहाणं हा करून घेतलेला आहे हे वेगळं सांगायची जरूरी नाही. एखाद्या सुप्रसिध्द शिकवणीमधून (well knows word coatching class/institute) चांगलासा कोर्स करायचा आणि त्याच
वेळी इंग्रजी थोडं 'पाँलिश' करायचं, आपली चमक दाखवण्यासाठी.मग काय तुम्हाला आय.टी मध्ये नोकरी पक्की.तरी सुध्दा तुम्हाला टीकूर रहायचं असेल तर काही महत्वाच्या गोष्टींवर ध्यान देणं जरूरीचं आहे.आपल्याकडे जे काही कमी आहे ते लोकांना दिसणार नाही याची काळजी घ्यायची.आपण सर्वज्ञ आहोत असच दाखवायचं.महागडे मोबाईल वापरायचे,तासन् तास त्यावर बोलण्याची सवय करायची. आणी बोलताना आपण आपली मातृभाषा वापरायची नाही. मोठे मोठे इंग्रजी शब्द वापरायचे.आणी कंपनी बाहेर असलं ही मोठमोठ्यांदा बोलायचं,आपलं वजन पडण्यासाठी.तरी हे करत असताना थोडेतरी लोक आपल्याला बघत आहेत याची खात्री करून घ्यायची.कंपनी मध्ये आणि बाहेत सुध्दा नेहमी काहीतरी जगावेगळं करण्याची तयारी ठेवायची, याच मुळे लोक तुमच्याकडे बघतील आणि वाहवा करतील.तुम्ही एखादी 'कागदी होडी' केली असेल तरी तिचं असंकाही वर्णन करायचं की सर्वजण थक्क झाले पाहिजेत.आपल्याबरोबर काम करणारा आपला शत्रू आहे हे फक्त मनात ठेवायचं, आणि त्याच्याशी बोलताना मधूर शब्दांचा वर्षाव करायचा.कंपनीमध्ये वेळ कसा घालवायचा याचं प्रशिक्षण वेगळं असं द्यायची गरज नाही.माणसाची आकलन क्षमता वाइट गोष्टींच्यावेळी ज्यास्तीत ज्यास्त असते.तरी माहिती
साठी म्हणून सांगतो. रोज मेल चेक करणं, २-३ वेळेला चहा काँफी पिणं, शक्यतेवढावेळ दुसर्‍याच्या डेस्क पाशी घालवणं आणि इतर काही.मित्रांमध्ये नेहमी आपली कंपनी कशी चांगली ते ठासूनपणे सांगता आलं पाहिजे. मी किती पैसा कमवतो पेक्षा किती उडवतो हे सांगता आलं पाहिजे.आपलं एक 'स्टेटस मेन्टेन' ठेवावं लागतं .त्यासाठी खूप नावाजलेल्या 'ब्रँड'चे कपडे घालायचे, चप्पल वापरायच्या. आपण ती गोष्ट किती रुपयांना आणि कुठून घेतली ते नं चूकता सांगायचं. ती गोष्ट घेताना एखादा साधा प्रसंग जरी घडला असेल तरी त्याचं वाढवून चढवून वर्णन करणं आपल्याला जमलं पाहिजे.हिच गोष्ट एखाद्या सुट्टीच्या दिवशी अनुभवलेल्या सहलीसाठी सुध्दा लागू आहे.थोडक्यात सगळ्याची 'हवा' करायची सवय करून घ्यायची.आकार कसाही झाला असला तरी मी स्वत:ला सुडौल ठेवण्यासाठी काय काय करते हे सांगणं बायकांना जमलं पाहिजे.आणि हो , 'जिम' मध्ये जाताना सुध्दा गाडी नेणं विसरू नका.आपण सुट्टीच्या दिवशी कंपनीमध्ये जाउन काम केलं तरी त्याचा विषय निघाला की काहीतरी 'स्मार्ट' उत्तर देउन विषय
टाळायचा.हाँटेल मध्ये गेलं की पिण्यासाठी 'मिनरल वाँटर' किंवा एखादं शीतपेय घ्यायचं. चमचे ,डीश 'टिश्यु पेपर' ने पुसुन घ्यायच्या. तरी काहीतरी कुसपट काढायचं आणि डिश बदलून घ्यायची.जेवण झालं की टिप न विसरता ठेवायची.थोडक्यात तुम्हाला जे काही नविन आणि अद्भूत असं करता येइल ते करायचं आणि त्यापेक्ष महत्वाचं ते दाखवता कसं येइल याकडे विशेष लक्ष द्यायचं,की झालात तुम्ही आय.टी. वाले !!!

Tuesday, March 20, 2007

रेलवेचा प्रवास

#### बँगलोर - पुणे प्रवासामध्ये अनुभवलेल्या काही आठवणी.

रेलवे पकडणं ही एक अवघड गोष्ट आहे हे विधान सर्वांसाठी खरं असावं.तिकिट काढल्यापासून प्रवासाचा दिवस येईपर्यंत मन अस्थीर असतं. उशिर झाला तर बस रस्त्यावर अडवणं शक्य आहे,रेलवेचं तसं नाही.ऐकायला तितकसं योग्य वाटत नसलं तरी ,कुठेना कुठे तरी सर्वांच्या मनामध्ये हाच विचार चालू असतोच.प्रवासाचा दिवस जसजसा जवळ येतो तसतशी माझी झोप कमी होते.मला मी कसा रेलवे स्टेशनवर वेळेवर पोहोचतो आणि रेलवे पकडतो हीच चिंता असते.तो दिवस आला.सुरुवात झाली ती रिक्शा पकडण्यापासून.रिक्शावाले अशा गडबडीच्यावेळी मनात येईल तो आकडा सांगतात.अशावेळी सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते ती म्हणजे ,आपल्याला या रिक्शाची गरजच नाही असा चेहर्‍यावर भाव आणायचा.तडजोड करण्यामध्ये बायका खूप सरावलेल्या असतात.माझ्या बायकोने ते काम छान प्रकारे पार पाडलं.शेवटी रिक्शावाला खाली आला.
बँगलोरमध्ये संध्याकाळी प्रवास करणे म्हणजे मरण.वेळेवर पोहोचायचं असेल तर १ तास आधी निघाल्याशिवाय गत्यंतर नाही.रिक्शा रस्त्यावरून कधी भिरभिरत, कधी रांगत रेलवे स्टेशनवर पोहोचली.शहरांचं वातावरण वेगवेगळं असलं, तरी रेलवे स्टेशनचं वातावरण प्रत्येक शहरामध्ये सारखंच असतं.काही लोक सैरावैरा धावत होते,काहीजण बाकड्यावर निवांत वाट बघत बसले होते, काहीजण जणू आपण कधी परतणारच नाही असा चेहरा करून बसले होते,काहिंनी मोबाईलचं खेळणं केलं होतं,काही खात होते,काही बाळं रडत होती, काही जण हमालाबरोबर वाद घालत होते,काही जण कचरा वाढवत होते आणि काहीजण सफाई करत होते.थोडक्यात प्रत्येकजण आपल्याच कामात गुंतलेला होता.दर थोड्यावेळाने तीन भाषांमध्ये येणार्‍या आणि जाणार्‍या गाड्यांची माहिती देण्यात येत होती.ह्या असल्या गोंधळाच्या वातावरणात मी रेलवे फलाटावर प्रवेश केला.रेलवे कुठल्या फलाटावर उभी रहाणार हे विचारण्यासाठी मी दारावरच उभ्या असलेल्या 'टिकिट चेकर' ला त्रास दिला.त्रास दिला म्हणजे त्याने तो करून घेतला.हिंदी ऐकून कन्नड लोक का वैतागतात माहीत नाही,पण मला हा अनुभव
बर्‍याच ठिकाणी आला आहे.माझा प्रश्न ऐकून त्याने 'आएगा' इतकच उत्तर दिलं.इतक्याने समाधान न झाल्याने मी विचारलं 'कहा आएगा?' तो 'प्लँटफाँर्म नंबर वन'. मी मागे पाहिलं तर, आधिच एक रेलवे तिथे उभी होती.कुतुहलाने मी विचारलं 'यहा तो रेलवे है,तो इसके पिछे आएगा क्या ?'तो 'याही आयेगा'हे ऐकून मी शांत झालो.पण बायको हे उत्तर मान्य करायला तयारच नाही.म्हणुन मी परत 'कब आयेगा?' तो 'ये जायेगा, वो आयेगा,छे बजे'तेव्हा कुठे वातावरण शांत झालं.मी जरा चांगलीशी जागा बाघितली आणि
सामान ठेवलं.आजुबाजूचं विश्व आपल्याच धुंदीत होतं.थोड्याच वेळात तीनही भाषांमध्ये आमची रेलवे येण्याचं सांगण्यात आलं आणि काही क्षणमध्येच फलाटावरचं वातावरण बदललं.शांत वाटणारे लोक जलद जतीने हालचाली करू लागले, आया पोरांचं रडं बाजुला ठेवून,जे काही पसरून ठेवलं आहे ते गुंडाळू लागल्या, लोकांनी सिगरेटी विझवल्या,पुड्यांचा फडशा पाडला, गटागट चहा पिण्यास सुरुवात झाली, असह्य बडबड आणि त्यामुळे होणारा गोंगाट सुरू झाला.जसजशी रेलवे जवळ येवू लागाली,तस तसे काही लोक आपला डबा कुठेतरी दुसरीकडेच थांबतो आहे, हे लक्षात येवून सामानाचा जडपणा जराही जाणावू न देता पळू लागले.वास्तविक बँगलोर रेलवे स्थानकावर सर्व ठिकाणी 'टि.व्ही सेट' लावले आहेत जेथे येणार्‍या गाड्यांची माहिती अगदी उत्तम प्रकारे दाखवली जाते, तसेच कोणता डबा कोठे थांबणार हे देखील ठिकठिकाणी लावलेल्या फलकांवरून सहज लक्षात येतं.तरीसुद्धा काही लोकांच्या स्वभावातच असतं हे,आधी विड्या फुंकत बसायचं आणि नंतर धावपळ.असो, सुदैवाने आम्ही योग्यजागी उभे होतो
आणि आमचं मोजकच आणलेलं सामान उचलून आम्ही डब्यात शिरलो.
------
डब्यामध्ये चालण्यासाठी एक चिंचोळा बोळ होता, सामान उचलून आम्ही कसे-बसे चालू शकत होतो.तेवढ्यात एक भयंकर वैतागलेली बाई उलटी येताना दिसली.बोलण्यावरून असं लक्षात आलं की ती चुकिच्या डब्यात शिरली होती. सर्वानी तिला खूप विरोध करण्याचा प्रयत्न केला , पण तिच्या आकारमानापुढे सगळ्यांनी हार मानली आणि तिला जाण्यासाठी रस्ता दिला.मी माझ्या जागेवर गेलो आणि सामान सुरक्षित ठिकाणी ठेवलं.मला रेलवे मध्ये सामान चोरीला जाण्याचा नाही अनुभव नाही, पण बाकिचे लोक सामनाला चेन आणि कुलपं लावत होते.आता माला एक प्रश्न नेहमी पडतो तो, रेलवे मध्ये जी 'चेन खिचिये और गाडी रोकिये' सोय असते त्या बद्दल.साधारणपणे, आपण गाडीमध्ये चोरी झाली
असं लक्षात आलं, तर त्याचा उपयोग करतो.पण चोर जो, चालत्या गाडी मधून पळून जावू शकत नाही त्याला आपण गाडी थांबवून , पळण्यासाठी मदत करतो,नाही का ? त्यामुळे यामध्ये काहीतरी बदल करावा हे नक्की.आता इंजिनचा आवाज सुरू झाला आणि थोडा वारा खेळू लागला. लोक स्थिरावू लागले,आणि प्रत्येक डब्यातून असंख्य प्लास्टीकच्या पिशव्या वाजायला सुरुवात झाली.ह्या 'सेकंड क्लास' मध्ये लोक गप्पा , खाणं आणि झोप याखेरीज काहिही करत नाहित. फारच थोडे लोक असतात जे पुस्तकं वाचतात.माझी बायको त्यातलीच, तिने एक जाड-जुड पुस्तक बाहेर काढलं आणि त्यात नाक खुपसलं. मी, लहानपणापासूनच पुस्तकेतर गोष्टींमध्ये ज्यास्त आवड असल्यामुळे , त्या रद्दीचं ओझं कधीच बरोबर ठेवत नाही.इकडे बायको वाचत होती आणि समोरचं विश्व खात होतं.माझ्यासमोर खिडकितून बाहेर बघत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.मी बाहेर बघत वेळ घालवण्याचा प्रयत्न सुरू केला. 'चाय-काँफीऽऽऽ'माझा वेळ घालवण्यासाठीच की काय माहित नाही ,पण आता एकेका फेरीवाल्याने आमच्या डब्यामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. चहा पिण्यासारखा दुसरा चांगला 'टाइम-पास' नाही. चहामध्ये थोडा चहा घातला असता तर त्या गरम पाण्याला चहाची चव आली असती.पण पायाखालची जमीन सरकत असताना मला असली तक्रार करून चालणार नाही,म्हणून मी पूर्वी एकदापुण्यामध्ये प्यालेल्या अमृततुल्यची आठवण करत तो चहा पिउन टाकलारेलवे प्रवासामध्ये एक गोष्ट सर्वांनी अनुभवली असेल,सुरुवातीला कोणीच बोलत नाही , कदाचित बघत पण नाहीत एकमेकांकडे.आपल्याच नादात काही तरी करत असतात. आपल्या कुटुंबापुरतं बोलणं,खाणं चालू असतं.आमच्या डब्यात पण तो बांध अजून फुटायचा होता.
वातावरण शांत झालं होतं,सर्व पोरांनी रडं थांबवलं होतं, खाण्याची तोंडं बंद झाली होती, लोक आपापल्या जागी स्थिरावले होते.काही लोकांचा डोळा लागला होता,त्यांनी शेजारी बसलेल्या खांद्याची उशी केली होती.पण उशांना ते ओझं होत होतं.'दिवसा कसला झोपतोस रे ? नको झोपू , रात्री तुला झोप नाही लागत' बायकोने चिमटा काढला तेव्हा मी जागा झालो. आमचा असा प्रेमळ संवाद नेहमीच चालू असतो. आमच्या बायकोला संध्याकाळचं झोपलेलं आवडत नाही. मी पुन्हा खिडकीतून बाहेत बघण्यास सुरुवात केली.रेलवे शेतं,घरं,नद्या,पूल,रस्ते काही क्षणात् मागे टाकत भरदाव वेगाने पुढे जात होती.
रेलवे मध्ये भिकार्‍यांचे पण वर्गीकरण केलेले आहे. काही शारिरीक व्यंग दाखवून पैसे मागतात,काही लहान मुलं दाखवून, काही गाणी गावून,वाद्य वाजवून दाखवतात.मी एक निराळीच जात पाहिली.एक बाई आली आणि आमच्या डब्याचा केर काढू लागली.तिने किती केर काढला माहित नाही पण ते काम झाल्या नंतर ती पैसे मागू लागली.मला काहीच कळेना.ती बाई जास्तीत जास्त केविलवाणे चेहरे करू लागली.मला भिकार्‍यांची खूप कमी वेळा दया येते.मी खिडकीतून बाहेर बघू लागलो.काही मासे गळाला लागल्यानंतर ती बाई पुढे निघुन गेली.या पुढे सुध्दा भेळ वाले,पेरू वाले, चहा वाले,बिस्किटवाले येत होते आणि जात होते.माझा वेळ छान चालला होता.आता बायकोला झोप आली आणि तिने माझ्यामांडीवर डोकं ठेवून पाय पसरले. वास्तविक मला मगाशी काढलेल्या चिमट्याचा बदला घेता आला असता पण पुरुष या भानगडीत पडत नाहीत.कारणं अनेक आहेत पण महत्वाचं कारण म्हणजे 'समजुतदारपणा'.या वाक्याने वादळ येईल, पण हेच सत्य आहे.(टाळ्या)
आता संध्याकाळ झाली होती, आणि बाहेरचं वातावरण बदललं होतं.सुर‍व्या शांत झाला होता.आता फेरीवाल्यांचा प्रकार बदलला होता. चहावाल्यांची जागा 'सूप'वाल्यांनी घेतली होती. पेपरवाले,भेळवाले दिसेनासे झाले होते.चहाचा धकसा घेतल्यानंतर मी सुपचा विचारपण नाही केला.बायकोला तो अनुभव नसल्यामुळे तिने ती 'रिस्क' घेतली. चव घेतल्यानंतरचा चेहरा मला अजुनही आठवतो. तिच्या म्हणण्या प्रमाणे 'टोमँटो केचप' पाण्यामध्ये घालून ते मिश्रण थोडावेळ उकळलं तर जे काही तयार होइल ते म्हणजे रेलवे मधील सूप.'एसी' डब्यामध्ये असल्या गोष्टी मिळत नाहित.तिथे पुतळ्यासारखं बसून रहाव लागतं.वागण्यामध्ये एक प्रकारचा पोक्तपणा लागतो. मोठ्याने बोलायचं नाही,खोकताना,शिंकताना रुमाल,निटनेटकं बसणं,शिस्तीत खाणं, घाण नाही कचरा नाही.डोळे मिटून बसलं तर माणूस शेजारी आहे की नाही हे कळणार पण नाही .साध्याडब्याचं तसं नाही. माणसाला माणुसाची किम्मत असते.आता लोकांनी 'क्राँस कम्युनिकेशन' करण्यास सुरुवात केली होती.सुरुवात ओळख करण्यापासून झाली. बायकांचे नेहमीचे साचेबद्ध बोलणं सुरू झालं.पुरुष आपापल्या उद्योग धंद्याबाबत चौकशी करू लागले.बिस्किट,गोळ्या,चणे,फुटाणे यांची देवाण घेवाण सुरू झाली.
----------
आता एका नविन फेरीवाल्यानी दर्शन दिलं.'डिनर सर'.बायकोचं आणि माझं अशा काही वेळेला जुळतं सुध्दा,आम्हाला दोघांनाही रेलवे मधलं जेवळ आवडत नाही.आम्ही घरातून जेवण आणलं होतं.मी त्याला डबा नको असल्याचं सांगितलं.तरी तो परत आला आणि पुन्हा विचारू लागला. यावेळी मी फक्त मान
हालवली.रेलवे मधे जेवताना आजुबाजूला पाहू नये. समोरच्या कुटुंबाने रेलवेचं कचरा कोंडाळ केलं होतं.बस मधून प्रवास करणारे खिडकीतून शक्यतो काही बाहेर टाकत नाहीत.गाडी थांबली की जे काही खायचं आहे ते खातात.रेलवेचं तसं नाही,आपल्याला हवं तेव्हा खाउ शकता आणि खिडकीतून बाहेर टाकलं की
विषय संपला.बायकोला त्यांच ते खाणं बघवेना, मी तिला माझ्याकडे बघून खाण्यास सांगितलं.ज्याकोणाला 'हायजिनिक' शब्दाबद्दल खूप प्रेम असेल त्यानी रेलवे मधून प्रवासच करू नये.मी जेवण आटोपलं आणि हात धुवायला 'बेसिन' जवळ गेलो.साध्या डब्यामध्ये नेहमी आढळून येणारा प्रश्न म्हणजे पाण्याचा,
आपण बाथरूम मध्ये जावं आणि पाणी संपलेलं असावं,या सारखं नशीब नाही.मी हात धुतले,नशीबाने तेव्हा पाणी होतं.मी उद्या लवकर उठून पाणी असे पर्यंत सर्व प्रात:विधी उरकून घ्यायचे याचाच विचार करत होतो.गाडी चालू असताना जेवण करणे, हात धूणे , आणि इतर प्रात: विधी करणे किती कठीण आहे हे, ज्यानी त्याचा अनुभव घेतलेला आहे तेच जाणून आहेत.रेलवे बाथरूम मधला लोटा हा कोणाला इतका प्रिय आहे , त्याचा तो चोर काय उपयोग करतो आणि त्याला त्या चोरीचा किती फायदा होतो माहित नाही,पण ही जिवनावश्यक गोष्ट नेहमी अद्रुष्य झालेली असते.त्यामुळे रेलवे प्रवासामध्ये एक पाण्याची
बाटली नेहमी जवळ ठेवावी,हा अजून एक सल्ला.आता जेवण झाल्यानंतर झोपेचा प्रश्न उरला होता. अशावेळी पाहिला विचार डोक्यात येतो तो सामान चोरीचा. सामानामध्ये अजुन एक आहे ती म्हणजे चप्पल.मी देवळात जाताना आणि रेलवे प्रवासामध्ये नेहमी जुन्या चप्पल वापरतो.निवांत देव दर्शन घेता येतं आणि रेलवे मध्ये शांत झोप लागते,अनुक्रमे.तरी बायकोने चप्पल शक्य तेवढ्या आत कोंबल्या.रेलवे तिकिट काढताना माणुस तरूण दिसला तर त्याच्या माथी 'अप्पर बर्थ' मारतात.त्यामुळे मला शिडी चढून झोपायचं होतं.'सावकाश रे, नाहीतर पंख्याला डोकं लागेल', बायको. मी कसाबसा मावलो त्या
जागी.माझ्यासमोरचा गालेलठ्ठ बराचवेळ शरीर वेडं वाकडं करून त्या जागेमध्ये मावण्याचा प्रयत्न करत होता.खूप 'कँलरीज्' खर्च करूनकुठे त्याला यश आलं.पंखा जिवाच्या अंतापर्यंत लोकांची सेवा करत होता आणि माझा हात जवळजवळ पंख्यात गेला होता.पोरांना कसं कळतं माहित नाही पण आता काही
पोरांचा आवाज येवू लागला होता.ही पोरं झोपमोड करण्यासाठीच जन्माला येतात असं माझं ठाम मत आहे.बायको कुरकुर कारू लागली.तिला झोपताना दिवा आणि आवाज बिलकुल चालत नाही.शेवटी मनाची खूप समजुत घालून ती पण झोपी गेली. सकाळ झाली तशी परत एकदा फेरीवाल्यानी हजेरी लावली.रात्रीतल्या रात्री काही जण आपापल्या गावी उतरले होते.त्यामुळे मला पाय पसरून बसण्याची जागा मिळाली.आता ती काही काळापुरती झालेली नाती तोडण्याचा क्षण आला होता.कुणास ठाउक परत कधी भेटतील की नाही.सर्वजण सामान बांधण्यात गुंतले होते.आमचं स्टेशन आलं.पुणे स्टेशनवर पहिलं पाउल ठेवताना बायकोला चंद्रावर पाउल ठेवताना जो आनंद झाला असेल, त्यापेक्षा जास्त
आनंद झाला होता.आम्ही रेलवेला रामराम ठोकला आणि स्टेशनच्या गर्दिमध्ये मिसळून गेलो.

Tuesday, March 13, 2007

मस्त मज्जा माडी - Part 3

बि.एम्.टी. बस मध्ये पुरुषांना बसण्यासाठी मागील भाग तर स्त्रीयांसाठी पुढचा भाग राखीव असतो.त्यामुळे पुरुष व स्त्रीयांचा संपर्क खूप कमी येतो.पुण्यामध्ये बसच्या डाव्याबाजुची जागा स्त्रीयांसाठी राखीव असते.या निर्णयावर बरेच वाद झाले. स्त्रीया राखीव जागा मिळाली ,यातच खूष आहेत.जयानगरची तुलना पुण्याच्या डेक्कनशी करायला हरकत नाही.लोक इथे वेळ घालवण्यासाठी येतात.मुली आपला मेकप आणि तोकडे कपडे दाखवायला आणि मुलं मुलीना बघायला, याच भागात येतात.बँगलोरला 'वनवें'च शहर सुध्दा म्हणतात, ते इथे येवून आपल्याला नक्की पटेल.
नेहमी प्रमाणे शक्यतेवढ्या सर्व मोठ्या 'ब्रँडस्'ची शोरुम्स् येथे आहेत. 'माँल्स' ही नवीन संस्कृती या 'काँस्मोपाँलिटन' शहरामध्ये आली आहे.इथे गल्लो गल्ली माँल्स आहेत.लोक येथे आपलं 'स्टेटस' दाखवायला येतात असं मला वाटतं.खूप पैसा उधळून , सगळीकडे लखलखाट करून ,३-४ मजल्यांमध्ये जास्तीत जास्त ब्रँडस् ची दुकाने एकत्र आली की, जी काही वास्तू तयार होते , त्याला माँल म्हणता येइल.या माँल मध्ये माझ्यासारखे 'मध्यम वर्गीय' फक्त वेळ घालवणे याच एका उदात्त हेतूने जाउ शकतात. विकत घेण्याच्या भानगडीत पडू नये. एकदा मी एका 'बरमुडा'ची किम्मत विचारली होती,त्याच किमतीमध्ये मला एक चांगल्या कंपनीची 'पँट' आली असती. मी 'थँक्यू'म्हणालो आणी पुढे निघालो.ह्या असल्या माँल्स मध्ये संभाषण फक्त 'आंग्ल' भाषेमध्ये करायचं असतं असचं माझ्या लक्षात आलं आहे. हिंदी मध्ये बोललं की सर्व लोक 'हा कोणत्या देशाचा?' अशा चेहर्‍याने बघतात.त्यात आमचं 'म्हींदी', मराठी लोक हिंदी बोलू लागले की ती शुद्ध हिंदी उरत नाही. 'भाइसाब, कांदा कैसे दिया ?' ऐकणारा माणूस तिन ताड उडतो. काहीच कळत नाही.हिंदीला सुद्धा मराठी 'टच' असतो.त्यामुळे संभाषण थोडं लांबतं. दोन वाक्यात संपू शकणारी गोष्ट एक निबंध बनून जाते.त्यातून बर्‍याच मजेशीर गोष्टी घडतात.एका अशाच माँलचा धसका मी घेतला होता. मी आत चाललो होतो तर समोरचा भला मोठा काचेचा दरवाजा आपोआप उघडला, मी घाबरून २-४ पावलं मागे गेलो. सांगायचा मुद्दा असा की हे माँल्स असल्या काहीतरी अत्याधुनीक गोष्टींनी भरलेले असतात.पाय न हालवता वरती नेणारे जिने, आपोआप चालू-बंद होणारे नळ ,आपोआप उघडणारे दरवाजे , हात वाळवण्याची यंत्रं इत्यादी.मी एका 'फास्ट फूड' दुकाना मधून व्हेज ग्रिल-सँडविच घेतलं आणि हिरव्यागार झाडांच्या सावलीमध्ये चालू लागलो.बँगलोर मध्ये येवून व्हेज ग्रिल सँडविच , फ्रुट ज्युस आणि पेस्ट्रीज खाल्याशिवाय कोणिच जाउ नये हा फुकटसल्ला.खाण्याच्या बाबतीत आपल्या लोकांचे इथे हाल होतात.महाराष्टीयन हाँटेलचं येथे दुर्भीक्ष आहे.त्यामुळे जे कोणी महाराष्टीयन जेवण करून देतात ते, आपल्याच लोकान्ना लुटतात हे माझंच नाही, तर इतरही बर्‍याच लोकांचं मत आहे.या हाँटेल मध्ये महाराष्ट्रीयन लोकांसाठी खास 'सबसिडी' असावी अशी मी इच्छा व्यक्त केली,ती पूर्ण होइल तेव्हा बँगलोर महाराष्ट्रीयन लोकांनी भरून जाईल याची मला खात्री आहे.

संध्याकाळी थोडा वेळ घालवण्यासाठी मी मित्राला फोन केला.पुण्याप्रमाणेच बँगलोर मध्ये स्वत:ची गाडी असावी म्हणजे कमी वेळेमध्ये कामं होवू शकतात.इथली बस सेवा खूप चांगली असून सुध्दा येथे सर्वात मोठा प्रश्न आहे तो 'वाहतुकीचा'.मुंबईमध्ये 'लोकल' आहे,त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करण्यामध्ये खूप मदत होते.तशी व्यवस्था सध्यातरी बँगलोर मध्ये नाही.त्यामुळे कामाच्यावेळेमध्ये बसेस तुडुंब भरलेल्या असतात.लोकांची खूप गैरसोय होते. यावर तोडगा म्हणून 'मेट्रो ट्रेन' हा नवीन
प्रोजेक्ट बँगलोर मध्ये सुरू झाला आहे.यामुळे वाहनांमध्ये थोडीफार कमी येईल असा अंदाज आहे.
गाडी असल्यामुळे मित्र १५ मिनिटामध्ये आला. आता उरलेला वेळ एखादा चित्रपट बघून घालवायचा यावर अथक प्रयत्नाने एकमत झालं.परत एकदा आम्ही एका माँल मध्ये शिरलो.आपण ज्याला 'थेटर' म्हणतो त्याला असल्या मोठ्या शहरामध्ये 'मल्टीप्लेक्स' म्हणतात. फरक इतकाच की येथे एका पेक्षा जास्त पडदे असतात.त्यामुळे फक्त चित्रपटाची वेळ बघून भागत नाही , आपल्याला कोणत्या पडद्यावर तो चित्रपट आहे हे सुध्हा बघावं लागतं. त्या श्रीमंतांच्या पडद्यावर चित्रपट बघण्यासाठी, तिकिटाने माझ्या
पाकिटाचा मोठा चावा घेतला होता. इथे 'बाल्कनी' ला 'गोल्ड क्लास' म्हणतात ही नविन गोष्ट मला कळाली.तिकिटाच्या किंमतीवरून नाव ठेवलं असावं. (एका टिपिकल पुणेकराचा द्रुष्टीकोन).
या ठिकाणी बायका दुसर्‍याबायकांचा मेकप, दागिने आणि पुरुष दुसर्‍यांच्या बायका बघायला येतात,या मताशी सर्वलोक नक्की सहमत होतील.आत गेलो आणि पैसे वसूल झाल्यासारखं वाटलं.खूप सूंदर व्यवस्था,कोणताही गोंधळ नाही, आरडा-ओरडा नाही,मंद संगीत लावून छान वातावरण निर्मिती केली होती.चित्रपट नेहमीप्रमाणेच रटाळ होता. लोक सुध्दा तो बघण्यासाठी येथे आले नसावेत.कारण त्यांचा बघण्यापेक्षा खाण्यावर जास्त जोर होता.
ब्रेक झाला, मी नेहमीच्या सवयी प्रमाणे वडापाव आणि चहा शोधू लागलो.पण नंतर लक्षात आलं की मी पुण्यात नाही.येथे सर्वलोक ब्रेक मध्ये 'लाह्या' खातात आणि शीतपेये पितात.लाह्यांच्या किमतीमध्ये माझं जेवण झालं असतं,पण कधी कधी जगाप्रमाणे आपल्यालासुध्दा बदलावं लागतं,मी पण त्या उधळपट्टी मध्ये सामील झालो.सुरु झालेली गोष्ट केव्हातरी संपणारच,तसा चित्रपट देखील संपला,आम्ही चेहर्‍यावर जास्तीत जास्त आनंदी भाव आणून बाहेर आलो.तरी पण भूक ही माणसाला काहीही खायला भाग पाडते आणि जे काही खाउ ते गोड लागतं.बरेचशे महाराष्ट्रीयन इथे याच एका दैवी शक्ती मुळे सुखी आहेत असं म्हणायला हरकत नाही.

बाहेर आलो,घड्याळ पाहिलं रात्रीचे ९:३० वाजले होते.बँगलोर मध्ये खूप लवकर रस्ते शांत होतात.पुण्यामध्ये रात्री १ ते सकाळचे ४ हाच वेळ मिळतो भुतांना मुक्त संचार करण्यासाठी.इथे तस नाही, लोक खूप लवकर घरी जातात आणि शक्यतो रात्री बाहेत पडत नाहीत.त्यामुळे रस्ते शांत होते आणि मंद वारा होता.आता प्रश्न होता जेवणाचा. परत एकदा तेच पंजाबी जेवण जेवायचं या विचारानेच मित्राने चेहरा वाकडा केला.मी 'चायनिज?' त्याला कल्पना आवडली.आता या वेळी बँगलोर मध्ये चालू असलेलं हाँटेल शोधणं या सारख अवघड काम नाही.चायनीज हाँटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असतात,त्यामुळे आमचा निर्णय योग्य होता.एका हाँटेल मध्ये शिरलो, शेवटचीच पंगत चालू असल्याप्रमाणे वातावरण होतं.आम्ही विचारलं तर 'ईट्झ क्लोज्ड , सर' हे उत्तर मिळालं.आम्ही जास्तीत जास्त 'बिचारे' चेहरे करुन आम्हाला एखादी डिश देण्यासाठी विनंती केली. त्याला दया आली. खाणं फरसं काही चांगलं नव्हतं.पण जे काही पानात पडेल ते गोड मानावं,हेच संस्कार लहानपणापासून झाल्यामुळे आम्ही अन्न गोड मानून घेतलं.नेहमी प्रमाणे वजनदार बिल आलं.बिल देउन आम्ही बाहेर आलो.
बँगलोर मध्ये वैयक्तीक आयुष्यासाठी वेळ बाजूला काढणं खूप कठीण असतं.त्यामुळे जोकाही वेळ मिळेल त्याचा पुरेपुर उपयोग करून घ्यायचा.कामाच्या दिवशी मित्रांना भेटणे शक्यच होत नाही.त्यामुळे 'आता भेट पुढच्या शनीवारी' असं म्हणून मी मित्राचा निरोप घेतला.रिक्शापकडली आणि घरी आलो. दिवसभर खूप फिरल्यामुळे थकलो होतो.आता दिवस संपला होता आणि मनामध्ये फक्त आठवणी उरल्या होत्या. त्या दिवशी भेटलेल्या आणि मला मदत केलेल्या सर्व लोकांचे आभार मानत ,अजुन एका अशाच 'यादगार' दिवसाची स्वप्नं बघत ,मी झोपी गेलो.

Wednesday, March 7, 2007

मस्त मज्जा माडी - Part 2

पत्ता शोधण्याच्या कामामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे इथली भाषा. मला सगळीकडे फक्त 'जिलब्या'च दिसत होत्या. माझ्या एका मित्राच्या म्हणण्या प्रमाणे 'साउथ ईंडिअंस' हे 'सर्प वंशीय'आहेत. त्यामुळे त्यांची भाषासुध्दा नागमोडी लिपिची असते.महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्ये यात सर्वात मोठा फरक काय असेल तर तो आहे भाषेचा. मराठी आणि हिंदी मुळाक्षरे सारखी असल्यामुळे 'उत्तर' भारतीय लोकाना पाट्या वाचणे जड जात नाही. त्यामुळे कामाच्या निमित्याने घराबाहेर पडणारे, दक्षिण भारतापेक्षा पुण्यासारखी ठिकाणे पसंत करतात.
शेवटी हाँटेलचा पत्ता मिळाला, आणि एक 'टिपिकल' दक्षिण भारतीय माणूस माझ्या समोर आला.'गुड्ड मार्निंग सर..' मी नुसताच हसलो. मराठी माणूस लगेच 'ओपन' नाही. आधी पारखतो , मगच तोंड चालू करतो.मी पण त्यातलाच.
हाँटेल मस्त होतं, मी आलो तसा एक माणूस "फ्रेश वाटर, सर" म्हणत आत आला. मी लगेच त्याला ईडली आणि फिल्टर काँफीची आँर्डर दिली.दक्षिण भारतामध्ये मी कधीच 'नेस्' काँफी घेत नाही. कारणे दोन इथे काँफीला जो 'फ्रेशनेस' असतो तो आपल्याकडे मिळत नाही. आणि कशाला उगाच परदेशी कंपनीचा 'प्राँफिट' वाढवा? हे म्हणजे म्हणजे आपल्याच बागेतले आंबे, दुसर्‍याकडून , ते पण महागात घ्यायचे ,अस्सं झालं.
झक्कास पैकी 'ब्रेकफास्ट' करून मी बाहेर पडलो.सुरुवात केली ती बसची चौकशी करण्यापासून.हे आणखी एक महाभयंकर काम , एका उच्यशिक्षित कन्नड माणसामुळे शक्य झालं.बहुदा 'पेंशनर' असावा, बोलायचा थांबेचना.. मी "थँक्यू सर" ...साउथ मध्ये कोणालाही आदर दाखवायचा आसेल तर 'सर' म्हणतात.
साउथ भाषेमधे काही त्रुटी असतील तर त्यांतील आकडे (नंबर) . इकडे कोणीच कन्नड आकडे वापरत नाही.सर्व ठिकाणी 'इंग्रजी' वापरतात. नाहितर बसच्या पाट्या कन्नड मध्ये आणि बस क्रमांक इंग्रजी असं का ? म्हणजे हा माझा अंदाज नाही तर मी असं कुठेतरी वाचलं आहे.बस पाहिली आणि मला माझी चूक लक्षात आली. तो जो माझ्याशी अर्धातास बोलून गेला त्याचं शेवटचं वाक्य होतं "टेक एन्नी बस्स टू बि.टी.एम् , अँड गेट डाउन अँट्ट जयानगर"पण माझं बालवाडी शिक्षण मराठीमधून झाल्यामुळे मला कन्नड वाचता येत नाही, आणि मी बस क्रमांक विचारलाच नव्हता. आता आणखी कोणालातरी विचारल्या शिवाय पर्याय नाही हे माझ्या लक्षात आलं.मी जवळच उभ्या असलेल्या एकाला विचारलं, तर तो माझ्याकडे एखादा 'अतिरेकी' बघावा तसा बघू लागला.इथे 'नार्थ ईंडिअन्स' ना बिलकुल किम्मत नाही. त्याना असं वाटतं की 'नार्थ ईंडिअन्स' नी बँगलोर महाग केलं. मी त्याचा नाद सोडला आणि दुसर्‍याला विचारलं. त्याने नेहमी प्रमाणे 'तुटक' हिंदी मध्ये नंबर सांगितला.थोड्याच वेळात बस आली आणि मी बस मध्ये बसलो.

किमान एक-एक तास बसची वाट पहायची सवय असणार्‍या पुणेकराला , हा सुखद धक्का होता. २ वर्षापूर्वी जेव्हा बंगलूर सोडून गेलो तेव्हाच मनामध्ये ठरवलं होतं , लग्न झालं की येथे एकदा तरी , परत नक्की यायचं. आणि ती इच्छा पूर्ण होवू शकली.ही गोष्ट आठवली आणि मनामध्येच हसलो. विचार केला 'काय नशिब असतं? काही वेळेला मख्खन सारखं सरळ आणि कधी कधी ... '

बसच्या बाबतीत बंगलूरचा पहिला क्रमांक आहे भारतामध्ये , असं मी ऐकून आहे. खोटं म्हणायला कोठेही जागा नाही. म्हणजे माझा अनुभव तसाच आहे. पण या बाबतीत अनेकांची भिंन्न मते आहेत.त्याचं असं आहे की, बस मिळणे ही गोष्ट आजवर कोणिच 'प्रेडिक्ट' करू शकलं नाही आहे. ज्याच्या राशीमध्ये
बस मिळण्याचा योग आहे त्याला ती मिळते.पि.एम्.टी. च्या बस या सर्व अंदाजाच्या बाहेर आहेत.ते वादळ कधी, केव्हा येईल, त्याचा अंदाज कोणतीच वेधशाळा देउ शकत नाही.आहेत म्हणायला एकादमात ४-५ बस , आणि नाहीतर 'पूज्य'एक कविता वाचली पि.एम्.टी. वर, त्यातील काही ओळी .
'मैने पुछा "कब से यहा खडे है" , कुर्सिपे बैठे बुढ्ढे तो जैसे ,जवानीसे यहा खडे है'
पुण्याच्या 'पब्लीक ट्रान्सपोर्ट' या विषयावर सुद्धा बरेच अग्रलेख छापून आले आहेत. पण दारंबंद संस्क्रुती पेपर वाचून मनस्ताप करायला शिकवते, बाहेर पडून काही कार्य करायची वेळ आली की "बस आहे , हे काय कमी आहे ?" असा युक्तीवाद (का, पळकुटेपणा ? ) ऐकायला मिळतो.

आँफिसच्या वेळेमध्ये बसेस तुडुंब भरलेल्या असतात, म्हणून ज्यांना सहज फिरायच आहे, त्यानी दुपारीच फिरावं ,हा सल्ला मी अनुभवातून देउ शकतो.त्या दिवशी रविवार आसल्यामुळे , गर्दी कमी होती. मला लगेच बसण्यासाठी जागा मिळाली.पुण्यामध्ये अशी जागा मिळणार्‍याच्या चेहर्‍यावर 'जग' जिंकल्याचा आनंद, मी कित्येक वेळेला पाहिलेला आहे.आणि खिडकीजवळची जागा मिळालीतर, मला वाटतं त्याचा सत्कारच केला पाहीजे.मला पण खिडकी जवळची जागा मिळाली. मी पुन्हा एकदा दिहोबाजुला पसरलेल्या हिरव्यागार वृक्षांचा आनंद घेवू लागलो.
तेवड्यात कोणाच्यातरी भांडणाचा आवाज आला. कंन्नड लोक सरळ बोलले तरी भांडल्यासारखे वाटतात.म्हणून मी दुर्लक्ष केलं आणि परत खिडकी मधून बाहेर बघू लागलोपण नंतर भयंकर अशुद्ध हिंदी ऐकू आलं, आणि मी त्यांचा संवाद ऐकायला सुरूवात केली.असं लक्षात आलं की, एका 'नार्थ ईंडिअन' ने एका पोलिसाला धक्का मारला , आणि तो पोलिस वैतागला.इथले पोलिस एका वेगळ्याच मिजाशित असतात,असा माझा वैयक्तीक अनुभव.पण येथे पोलिसांना खुप मानतात , आदर करतात.तर, वैतागुन त्या पोलिसाने त्या माणसाला एक ठेवुन दिली. त्या माणसाने पण त्याला मारण्याचा प्रयत्न केला.त्यावर आमचे आदरणीय कंडक्टर साहेब पुढे सरसावले "यहा ऐसा नही चलता, इधर हम पुलिसको रिसपेक्ट करता है. ये सब तुम्हारे 'नार्थ इंडिया'मे चलता होयेगा"
त्यात त्या 'नार्थ ईंडिअन'चं नशिब वाइट , तो दारू प्याला होता. सर्वानी मिळुन त्याला बस बाहेर काढला.तोपर्यंत माझा स्टाँप आला आणि मी खाली उतरलो. NEXT PART

मस्त मज्जा माडी - Part 1

बँगलोर मध्ये आलो याची खूण आहे, एखाद्यातरी रेडीओ चँनेलवर 'मस्त मज्जा माडी' हे ऐकू आलच पाहिजे. तब्बल २ वर्षांनी मी बँगलोरला परतताना मनामध्ये खूप आनंद होता. इतक्या दिवसांनी सुध्दा बर्‍याचश्या गोष्टी जशा च्या तशा होत्या. ए.सी. डब्यातून बाहेर येत होतो की, लाल हमालांनी अंगावर हल्ला केला . पण या वेळी मी सावध होतो. म्हणून आधीच सामान उचलून चालू लागलो.मागच्याखेपेला दहा पावलं चालायची होती , त्या साठी ८० रुपये मोजले होते.
बाहेर आलो , प्रिपेड रिक्शाच्या रांगेत उभा राहीलो.'आमच्या' पुण्यामध्येपण आहे ही सेवा.पण शेवटचं आठवतं तेव्हा मी स्वारगेट बस स्थानकावर होतो, आणि प्रिपेड सेवा उपलब्ध नसल्याचं कारण सांगण्यात आलं होता की 'कँपुटर बंद आहे'येथुन माझं मन पुणे आणि बँगलोर मधील फरक शोधण्यात गुंतलं होतं.
भिकारी हे रेल्वेचे खास आकर्षण, त्या लोकाना इथून हलवल्यास रेलवे कर्मचार्‍यांना बहुदा तुरुंगात डांबत असावेत , असो, तर इथे भिकारी 'मिसिंग' होते , भिकारी कधीच संपावर गेल्याचं ऐकलं नाही. बहुदा त्यादिवशी ते संपावर गेले असावेत असा मी अंदाज केला. ( पुण्यातील भिकारी कधीच संपावर जात नाहीत ) तेवढ्यात प्लँटफाँर्मवर थोडा केर राहिल्याबद्दल एक माणूस (बहुदा अधिकारी असावा) एका बाईला ओरडत होता. आणि कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल, ती बाई निमुटपणे काम करत होती. आमच्याकडे असा कोणी अधिकारी ओरडला तर बायका 'वस्स..' करून अंगावर येतात.असो प्लँटफाँर्म एकुणच खुप स्वच्छ वाटत होता.
रांग पुढे जात होती आणि माझा नंबर आला,खिडकी जवळ आलो पाहतो तर,कुपन देणारा माणुस चक्क तरुण होता,अजुन एक आश्चर्य. आमच्याकडे ही असली कामं
करण्यासाठी मी फक्त 'वयस्क' व्यक्ती पाहिलेल्या आहेत,कदाचीत त्यामुळेच मला त्याच्या कपाळावर आठ्या दिसल्या नाहीत आणि माझ्यावर जराही न खेकसता मला 'कुपन' मिळालं.आणि रिक्शत बसल्या बसल्या मी दिवसभर काय करायचं त्याचं 'प्लँनिंग' सुरू केलं.
बँगलोरची हवा एकूणच थंड, त्यात भर म्हणून हलका वारा पण असतो. त्यामुळे वारा थोडा झोंबत होता. सकाळची वेळ असल्यामुळे 'प्रदुषणा'चे प्रमाण जरा कमी, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मंद वारा यामुळे खुप छान वाटत होतं , दारं नसलेल्या रिक्शामधून फिरताना. बँगलोरच्या प्रदुषणा बद्दल बरच काही वाचलं आणि ऐकलं होतं, पण सकाळच्या वेळी तसं काहीच जाणवलं नाही.
'पब्लिक प्लँटफाँर्म' ही एक गोष्ट मला येथे पहावयास मिळाली, विषेश म्हणजे त्याचा उपयोग 'आम जनता'च करत होती.हसू नका , पण ही म्हणजे एका पुणेकराला
आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट आहे आमच्या पुण्यामध्ये याचा उपयोग चहा वाले , अंडा-भुर्जि वाले , पानपट्टी वाले , रात्रीच्यावेळी रिक्शावाले, भिकारी ,आणि पि.एम्.सी चे वापराचे सामान ठेवणे -याच
काही महत्वाच्या कामासाठी केला जातो. लोक, इतर गाड्यांना काही त्रास न होवु देता , रस्त्याचा वापर करतात. आधुनिक पुणेकराला अजुन आपल्या हक्काची जाणीव झालेली नाही आहे, ही चिंतेची बाब आहे, तो दिवस दूर नाही जेव्हा पुणेकर 'पब्लिक प्लँटफाँर्म' वरून चालतील, आणि पुणे गाडामुक्त संस्क्रुतीमध्ये जगत असेल. (टाळ्या ..)
बंगलोर मध्ये मला सर्वात काय आवडत असेल तर इथले भले मोठे वृक्ष.रस्त्याच्या दोहो बाजुंनी हिरवी झाडं गार सावली देतात. यातील काही वृक्ष तर १०० वर्षापूर्वीचे आहेत म्हणे.एकूणच महानगर पालिका झाडांची काळजी घेते हे बंगलोर मध्ये पाउल ठेवता क्षणीच कोणाच्याही लक्षात येइल. अशा प्रकारचे वृक्ष पुण्यामधे 'सिंहगड' रोड वर होते एकेकाळी. तो रस्ता जेव्हा सिमेंटचा केला तेव्हा सर्व वृक्ष तोडण्यात आले, लोकानी आनंद व्यक्त केला , कारण त्यांचा खूप वेळ वाचणार होता, त्या रस्ता रुंदिकरणमुळे.पण ज्या भागातील वृक्ष तोडले गेले तेथे रहाणार्‍या लोकाना घराचं घरपण गेल्यासारखं वाटत होतं.बरेच जण आजही डोळ्यातून पाणी काढतात, त्या वृक्षांचा विषय काढला की.सुदैवाने वृक्ष 'वट' वृक्ष असल्यामुळे त्यांचे परत रोपण केले. त्यातील किती जिवंत आहेत, त्याची कल्पना नाहीपुणे महानगर पालिकेला 'वृक्षांचं' महत्व अजुनही कळालेलं नाही, वृक्ष पाहिला की कदाचीत त्याना 'वखार' दिसते...ज्या गतीने पुण्यामधील वृक्ष तोडले गेले , त्यावरून हेच विधान योग्य वाटते.
मी बँगलोरच्या वृक्ष सौंदर्याचा आनंद घेत होतो आणि रिक्शावाला शक्य तेवढ्या ज्यास्त वेगाने रिक्शा चालवत होता.रिक्शावाले सगळीकडे सारखेच असतात , बंगलोरचे अधिक वाईट आहेत कारण ते हिंदी ला किम्मत देत नाहीत. आपण जरी हिंदी मध्ये बोललो तरी उत्तर 'कन्नड' मधूनच
मिळातं.ज्याला हावा तो अर्थ, त्याने लावावा. पण आधुनिक संस्क्रुती मध्ये आपण 'आंग्ल' शब्दांचा वापर आधीक करत असल्यामुळे, 'लेफ्ट' , 'राइट' , 'स्टाँप', 'स्ट्रेट' आणि इतर काही शब्द एकदम 'काँमन' झाले आहेत, त्यामुळे आयुष्य थोड'ईझी' झालं आहे.रिक्शावाला विचारतो "स्ट्रेट जाना?" आपण फक्त "हा"
म्हणायचं.
बँगलोर मध्ये 'सि.एन्. जी' वापरणं बंधनकाराक नाही, तरी सुद्धा बर्‍याच रिक्शा 'सि.एन्.जी' वापरतात. मला वाटतं सर्व मुख्य शहरांमध्ये 'सि.एन्. जी' वापरणं बंधनकारक केलं पाहिजे, तरच येथील प्रदुषण आटोक्यात राहील.पुण्यांध्ये काही दिवसापूर्वी, १५ वर्षापेक्षा जुन्या रिक्शांना 'सि.एन्.जी' बंधनकारक केलं होतं. ते आमलात आणेपर्यंत आणखी ५ वर्ष जातील. प्रदुषण 'जैसे थे' ... सरकार डोळे मिटून आणि 'ए.सी.' मध्ये बसून सर्व काही योग्य प्रकारे 'मँनेज' करत आहे.लोक नेहमी प्रमाणे २-४ दिवस मोठा आवाज करतात , 'सकाळ' चघळतात, आणि काही दिवसांनी 'युजलेस फेलोज' असं मनामध्येच पुटपुटतं शांत होतात. जे कोणी यासाठी दिवस रात्र काम करतात त्यांच्या फायली कात्रणाने भरून पुन्हा एकदा त्याच कोनाड्यमध्ये लपुन बसतात.
बँगलोरमध्ये पत्ता शोधणं म्हणजे एक कसरत आहे, तुमचा पत्ता , आधी म्हटल्या प्रमाणे , जर 'लेफ्ट' , 'राइट' , 'स्ट्रेट' , या मापात बसला तर तुम्ही नशिबवान, नाहीतर खिशाला 'फाळ'.पुण्यापेक्षा रिक्शा थोडी महाग आहे आणि माझ्यामाहिती प्रमाणे 'फसवणूक' सुद्धा . येथे तुमच्याकडे सामान असणं याला रिक्शावाले 'गुन्हा' मानत असावेत, कारण तुमच्याकडे एक पिशवी जरी असली तरी ते 'लगेज चार्ज' मागतात. पण पुण्यामध्ये रिक्शावाल्याशी भांडणाची सवय असल्यामुळे इथे फार कठीण गेलं नाही.'टेन रुपिज एक्ट्रा दुंगा' असं मोठ्या आवाजात म्हटलं, की काम होतं. तसे बँगलोर वासीय मुळात साधे सरळ लोक. NEXT PART