Tuesday, March 20, 2007

रेलवेचा प्रवास

#### बँगलोर - पुणे प्रवासामध्ये अनुभवलेल्या काही आठवणी.

रेलवे पकडणं ही एक अवघड गोष्ट आहे हे विधान सर्वांसाठी खरं असावं.तिकिट काढल्यापासून प्रवासाचा दिवस येईपर्यंत मन अस्थीर असतं. उशिर झाला तर बस रस्त्यावर अडवणं शक्य आहे,रेलवेचं तसं नाही.ऐकायला तितकसं योग्य वाटत नसलं तरी ,कुठेना कुठे तरी सर्वांच्या मनामध्ये हाच विचार चालू असतोच.प्रवासाचा दिवस जसजसा जवळ येतो तसतशी माझी झोप कमी होते.मला मी कसा रेलवे स्टेशनवर वेळेवर पोहोचतो आणि रेलवे पकडतो हीच चिंता असते.तो दिवस आला.सुरुवात झाली ती रिक्शा पकडण्यापासून.रिक्शावाले अशा गडबडीच्यावेळी मनात येईल तो आकडा सांगतात.अशावेळी सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते ती म्हणजे ,आपल्याला या रिक्शाची गरजच नाही असा चेहर्‍यावर भाव आणायचा.तडजोड करण्यामध्ये बायका खूप सरावलेल्या असतात.माझ्या बायकोने ते काम छान प्रकारे पार पाडलं.शेवटी रिक्शावाला खाली आला.
बँगलोरमध्ये संध्याकाळी प्रवास करणे म्हणजे मरण.वेळेवर पोहोचायचं असेल तर १ तास आधी निघाल्याशिवाय गत्यंतर नाही.रिक्शा रस्त्यावरून कधी भिरभिरत, कधी रांगत रेलवे स्टेशनवर पोहोचली.शहरांचं वातावरण वेगवेगळं असलं, तरी रेलवे स्टेशनचं वातावरण प्रत्येक शहरामध्ये सारखंच असतं.काही लोक सैरावैरा धावत होते,काहीजण बाकड्यावर निवांत वाट बघत बसले होते, काहीजण जणू आपण कधी परतणारच नाही असा चेहरा करून बसले होते,काहिंनी मोबाईलचं खेळणं केलं होतं,काही खात होते,काही बाळं रडत होती, काही जण हमालाबरोबर वाद घालत होते,काही जण कचरा वाढवत होते आणि काहीजण सफाई करत होते.थोडक्यात प्रत्येकजण आपल्याच कामात गुंतलेला होता.दर थोड्यावेळाने तीन भाषांमध्ये येणार्‍या आणि जाणार्‍या गाड्यांची माहिती देण्यात येत होती.ह्या असल्या गोंधळाच्या वातावरणात मी रेलवे फलाटावर प्रवेश केला.रेलवे कुठल्या फलाटावर उभी रहाणार हे विचारण्यासाठी मी दारावरच उभ्या असलेल्या 'टिकिट चेकर' ला त्रास दिला.त्रास दिला म्हणजे त्याने तो करून घेतला.हिंदी ऐकून कन्नड लोक का वैतागतात माहीत नाही,पण मला हा अनुभव
बर्‍याच ठिकाणी आला आहे.माझा प्रश्न ऐकून त्याने 'आएगा' इतकच उत्तर दिलं.इतक्याने समाधान न झाल्याने मी विचारलं 'कहा आएगा?' तो 'प्लँटफाँर्म नंबर वन'. मी मागे पाहिलं तर, आधिच एक रेलवे तिथे उभी होती.कुतुहलाने मी विचारलं 'यहा तो रेलवे है,तो इसके पिछे आएगा क्या ?'तो 'याही आयेगा'हे ऐकून मी शांत झालो.पण बायको हे उत्तर मान्य करायला तयारच नाही.म्हणुन मी परत 'कब आयेगा?' तो 'ये जायेगा, वो आयेगा,छे बजे'तेव्हा कुठे वातावरण शांत झालं.मी जरा चांगलीशी जागा बाघितली आणि
सामान ठेवलं.आजुबाजूचं विश्व आपल्याच धुंदीत होतं.थोड्याच वेळात तीनही भाषांमध्ये आमची रेलवे येण्याचं सांगण्यात आलं आणि काही क्षणमध्येच फलाटावरचं वातावरण बदललं.शांत वाटणारे लोक जलद जतीने हालचाली करू लागले, आया पोरांचं रडं बाजुला ठेवून,जे काही पसरून ठेवलं आहे ते गुंडाळू लागल्या, लोकांनी सिगरेटी विझवल्या,पुड्यांचा फडशा पाडला, गटागट चहा पिण्यास सुरुवात झाली, असह्य बडबड आणि त्यामुळे होणारा गोंगाट सुरू झाला.जसजशी रेलवे जवळ येवू लागाली,तस तसे काही लोक आपला डबा कुठेतरी दुसरीकडेच थांबतो आहे, हे लक्षात येवून सामानाचा जडपणा जराही जाणावू न देता पळू लागले.वास्तविक बँगलोर रेलवे स्थानकावर सर्व ठिकाणी 'टि.व्ही सेट' लावले आहेत जेथे येणार्‍या गाड्यांची माहिती अगदी उत्तम प्रकारे दाखवली जाते, तसेच कोणता डबा कोठे थांबणार हे देखील ठिकठिकाणी लावलेल्या फलकांवरून सहज लक्षात येतं.तरीसुद्धा काही लोकांच्या स्वभावातच असतं हे,आधी विड्या फुंकत बसायचं आणि नंतर धावपळ.असो, सुदैवाने आम्ही योग्यजागी उभे होतो
आणि आमचं मोजकच आणलेलं सामान उचलून आम्ही डब्यात शिरलो.
------
डब्यामध्ये चालण्यासाठी एक चिंचोळा बोळ होता, सामान उचलून आम्ही कसे-बसे चालू शकत होतो.तेवढ्यात एक भयंकर वैतागलेली बाई उलटी येताना दिसली.बोलण्यावरून असं लक्षात आलं की ती चुकिच्या डब्यात शिरली होती. सर्वानी तिला खूप विरोध करण्याचा प्रयत्न केला , पण तिच्या आकारमानापुढे सगळ्यांनी हार मानली आणि तिला जाण्यासाठी रस्ता दिला.मी माझ्या जागेवर गेलो आणि सामान सुरक्षित ठिकाणी ठेवलं.मला रेलवे मध्ये सामान चोरीला जाण्याचा नाही अनुभव नाही, पण बाकिचे लोक सामनाला चेन आणि कुलपं लावत होते.आता माला एक प्रश्न नेहमी पडतो तो, रेलवे मध्ये जी 'चेन खिचिये और गाडी रोकिये' सोय असते त्या बद्दल.साधारणपणे, आपण गाडीमध्ये चोरी झाली
असं लक्षात आलं, तर त्याचा उपयोग करतो.पण चोर जो, चालत्या गाडी मधून पळून जावू शकत नाही त्याला आपण गाडी थांबवून , पळण्यासाठी मदत करतो,नाही का ? त्यामुळे यामध्ये काहीतरी बदल करावा हे नक्की.आता इंजिनचा आवाज सुरू झाला आणि थोडा वारा खेळू लागला. लोक स्थिरावू लागले,आणि प्रत्येक डब्यातून असंख्य प्लास्टीकच्या पिशव्या वाजायला सुरुवात झाली.ह्या 'सेकंड क्लास' मध्ये लोक गप्पा , खाणं आणि झोप याखेरीज काहिही करत नाहित. फारच थोडे लोक असतात जे पुस्तकं वाचतात.माझी बायको त्यातलीच, तिने एक जाड-जुड पुस्तक बाहेर काढलं आणि त्यात नाक खुपसलं. मी, लहानपणापासूनच पुस्तकेतर गोष्टींमध्ये ज्यास्त आवड असल्यामुळे , त्या रद्दीचं ओझं कधीच बरोबर ठेवत नाही.इकडे बायको वाचत होती आणि समोरचं विश्व खात होतं.माझ्यासमोर खिडकितून बाहेर बघत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.मी बाहेर बघत वेळ घालवण्याचा प्रयत्न सुरू केला. 'चाय-काँफीऽऽऽ'माझा वेळ घालवण्यासाठीच की काय माहित नाही ,पण आता एकेका फेरीवाल्याने आमच्या डब्यामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. चहा पिण्यासारखा दुसरा चांगला 'टाइम-पास' नाही. चहामध्ये थोडा चहा घातला असता तर त्या गरम पाण्याला चहाची चव आली असती.पण पायाखालची जमीन सरकत असताना मला असली तक्रार करून चालणार नाही,म्हणून मी पूर्वी एकदापुण्यामध्ये प्यालेल्या अमृततुल्यची आठवण करत तो चहा पिउन टाकलारेलवे प्रवासामध्ये एक गोष्ट सर्वांनी अनुभवली असेल,सुरुवातीला कोणीच बोलत नाही , कदाचित बघत पण नाहीत एकमेकांकडे.आपल्याच नादात काही तरी करत असतात. आपल्या कुटुंबापुरतं बोलणं,खाणं चालू असतं.आमच्या डब्यात पण तो बांध अजून फुटायचा होता.
वातावरण शांत झालं होतं,सर्व पोरांनी रडं थांबवलं होतं, खाण्याची तोंडं बंद झाली होती, लोक आपापल्या जागी स्थिरावले होते.काही लोकांचा डोळा लागला होता,त्यांनी शेजारी बसलेल्या खांद्याची उशी केली होती.पण उशांना ते ओझं होत होतं.'दिवसा कसला झोपतोस रे ? नको झोपू , रात्री तुला झोप नाही लागत' बायकोने चिमटा काढला तेव्हा मी जागा झालो. आमचा असा प्रेमळ संवाद नेहमीच चालू असतो. आमच्या बायकोला संध्याकाळचं झोपलेलं आवडत नाही. मी पुन्हा खिडकीतून बाहेत बघण्यास सुरुवात केली.रेलवे शेतं,घरं,नद्या,पूल,रस्ते काही क्षणात् मागे टाकत भरदाव वेगाने पुढे जात होती.
रेलवे मध्ये भिकार्‍यांचे पण वर्गीकरण केलेले आहे. काही शारिरीक व्यंग दाखवून पैसे मागतात,काही लहान मुलं दाखवून, काही गाणी गावून,वाद्य वाजवून दाखवतात.मी एक निराळीच जात पाहिली.एक बाई आली आणि आमच्या डब्याचा केर काढू लागली.तिने किती केर काढला माहित नाही पण ते काम झाल्या नंतर ती पैसे मागू लागली.मला काहीच कळेना.ती बाई जास्तीत जास्त केविलवाणे चेहरे करू लागली.मला भिकार्‍यांची खूप कमी वेळा दया येते.मी खिडकीतून बाहेर बघू लागलो.काही मासे गळाला लागल्यानंतर ती बाई पुढे निघुन गेली.या पुढे सुध्दा भेळ वाले,पेरू वाले, चहा वाले,बिस्किटवाले येत होते आणि जात होते.माझा वेळ छान चालला होता.आता बायकोला झोप आली आणि तिने माझ्यामांडीवर डोकं ठेवून पाय पसरले. वास्तविक मला मगाशी काढलेल्या चिमट्याचा बदला घेता आला असता पण पुरुष या भानगडीत पडत नाहीत.कारणं अनेक आहेत पण महत्वाचं कारण म्हणजे 'समजुतदारपणा'.या वाक्याने वादळ येईल, पण हेच सत्य आहे.(टाळ्या)
आता संध्याकाळ झाली होती, आणि बाहेरचं वातावरण बदललं होतं.सुर‍व्या शांत झाला होता.आता फेरीवाल्यांचा प्रकार बदलला होता. चहावाल्यांची जागा 'सूप'वाल्यांनी घेतली होती. पेपरवाले,भेळवाले दिसेनासे झाले होते.चहाचा धकसा घेतल्यानंतर मी सुपचा विचारपण नाही केला.बायकोला तो अनुभव नसल्यामुळे तिने ती 'रिस्क' घेतली. चव घेतल्यानंतरचा चेहरा मला अजुनही आठवतो. तिच्या म्हणण्या प्रमाणे 'टोमँटो केचप' पाण्यामध्ये घालून ते मिश्रण थोडावेळ उकळलं तर जे काही तयार होइल ते म्हणजे रेलवे मधील सूप.'एसी' डब्यामध्ये असल्या गोष्टी मिळत नाहित.तिथे पुतळ्यासारखं बसून रहाव लागतं.वागण्यामध्ये एक प्रकारचा पोक्तपणा लागतो. मोठ्याने बोलायचं नाही,खोकताना,शिंकताना रुमाल,निटनेटकं बसणं,शिस्तीत खाणं, घाण नाही कचरा नाही.डोळे मिटून बसलं तर माणूस शेजारी आहे की नाही हे कळणार पण नाही .साध्याडब्याचं तसं नाही. माणसाला माणुसाची किम्मत असते.आता लोकांनी 'क्राँस कम्युनिकेशन' करण्यास सुरुवात केली होती.सुरुवात ओळख करण्यापासून झाली. बायकांचे नेहमीचे साचेबद्ध बोलणं सुरू झालं.पुरुष आपापल्या उद्योग धंद्याबाबत चौकशी करू लागले.बिस्किट,गोळ्या,चणे,फुटाणे यांची देवाण घेवाण सुरू झाली.
----------
आता एका नविन फेरीवाल्यानी दर्शन दिलं.'डिनर सर'.बायकोचं आणि माझं अशा काही वेळेला जुळतं सुध्दा,आम्हाला दोघांनाही रेलवे मधलं जेवळ आवडत नाही.आम्ही घरातून जेवण आणलं होतं.मी त्याला डबा नको असल्याचं सांगितलं.तरी तो परत आला आणि पुन्हा विचारू लागला. यावेळी मी फक्त मान
हालवली.रेलवे मधे जेवताना आजुबाजूला पाहू नये. समोरच्या कुटुंबाने रेलवेचं कचरा कोंडाळ केलं होतं.बस मधून प्रवास करणारे खिडकीतून शक्यतो काही बाहेर टाकत नाहीत.गाडी थांबली की जे काही खायचं आहे ते खातात.रेलवेचं तसं नाही,आपल्याला हवं तेव्हा खाउ शकता आणि खिडकीतून बाहेर टाकलं की
विषय संपला.बायकोला त्यांच ते खाणं बघवेना, मी तिला माझ्याकडे बघून खाण्यास सांगितलं.ज्याकोणाला 'हायजिनिक' शब्दाबद्दल खूप प्रेम असेल त्यानी रेलवे मधून प्रवासच करू नये.मी जेवण आटोपलं आणि हात धुवायला 'बेसिन' जवळ गेलो.साध्या डब्यामध्ये नेहमी आढळून येणारा प्रश्न म्हणजे पाण्याचा,
आपण बाथरूम मध्ये जावं आणि पाणी संपलेलं असावं,या सारखं नशीब नाही.मी हात धुतले,नशीबाने तेव्हा पाणी होतं.मी उद्या लवकर उठून पाणी असे पर्यंत सर्व प्रात:विधी उरकून घ्यायचे याचाच विचार करत होतो.गाडी चालू असताना जेवण करणे, हात धूणे , आणि इतर प्रात: विधी करणे किती कठीण आहे हे, ज्यानी त्याचा अनुभव घेतलेला आहे तेच जाणून आहेत.रेलवे बाथरूम मधला लोटा हा कोणाला इतका प्रिय आहे , त्याचा तो चोर काय उपयोग करतो आणि त्याला त्या चोरीचा किती फायदा होतो माहित नाही,पण ही जिवनावश्यक गोष्ट नेहमी अद्रुष्य झालेली असते.त्यामुळे रेलवे प्रवासामध्ये एक पाण्याची
बाटली नेहमी जवळ ठेवावी,हा अजून एक सल्ला.आता जेवण झाल्यानंतर झोपेचा प्रश्न उरला होता. अशावेळी पाहिला विचार डोक्यात येतो तो सामान चोरीचा. सामानामध्ये अजुन एक आहे ती म्हणजे चप्पल.मी देवळात जाताना आणि रेलवे प्रवासामध्ये नेहमी जुन्या चप्पल वापरतो.निवांत देव दर्शन घेता येतं आणि रेलवे मध्ये शांत झोप लागते,अनुक्रमे.तरी बायकोने चप्पल शक्य तेवढ्या आत कोंबल्या.रेलवे तिकिट काढताना माणुस तरूण दिसला तर त्याच्या माथी 'अप्पर बर्थ' मारतात.त्यामुळे मला शिडी चढून झोपायचं होतं.'सावकाश रे, नाहीतर पंख्याला डोकं लागेल', बायको. मी कसाबसा मावलो त्या
जागी.माझ्यासमोरचा गालेलठ्ठ बराचवेळ शरीर वेडं वाकडं करून त्या जागेमध्ये मावण्याचा प्रयत्न करत होता.खूप 'कँलरीज्' खर्च करूनकुठे त्याला यश आलं.पंखा जिवाच्या अंतापर्यंत लोकांची सेवा करत होता आणि माझा हात जवळजवळ पंख्यात गेला होता.पोरांना कसं कळतं माहित नाही पण आता काही
पोरांचा आवाज येवू लागला होता.ही पोरं झोपमोड करण्यासाठीच जन्माला येतात असं माझं ठाम मत आहे.बायको कुरकुर कारू लागली.तिला झोपताना दिवा आणि आवाज बिलकुल चालत नाही.शेवटी मनाची खूप समजुत घालून ती पण झोपी गेली. सकाळ झाली तशी परत एकदा फेरीवाल्यानी हजेरी लावली.रात्रीतल्या रात्री काही जण आपापल्या गावी उतरले होते.त्यामुळे मला पाय पसरून बसण्याची जागा मिळाली.आता ती काही काळापुरती झालेली नाती तोडण्याचा क्षण आला होता.कुणास ठाउक परत कधी भेटतील की नाही.सर्वजण सामान बांधण्यात गुंतले होते.आमचं स्टेशन आलं.पुणे स्टेशनवर पहिलं पाउल ठेवताना बायकोला चंद्रावर पाउल ठेवताना जो आनंद झाला असेल, त्यापेक्षा जास्त
आनंद झाला होता.आम्ही रेलवेला रामराम ठोकला आणि स्टेशनच्या गर्दिमध्ये मिसळून गेलो.